पुणे जिल्हा | मुळशीला गट विकास अधिकारी पूर्णवेळ नसल्याने नागरिकांचे हाल

पौड (वार्ताहर) – मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे मुळशीचा पूर्णवेळ तर मावळचा अतिरिक्त पदभार आहे. मुळशी आणि मावळ दोन्ही तालुके मोठे असून त्यांना फक्त मुळशी तालुक्याचा गटविकास अधिकारी म्हणून पदभार सोपवावा, अशी मागणी मुळशी तालुक्यात जोर धरू लागली आहे.
एक वर्षापूर्वी मुळशीतून गटविकास अधिकारी संदीप जठार यांची बदली झाली. तेव्हा सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी गटविकास अधिकारी म्हणून काही दिवस अतिरिक्त पदभार संभाळला.तालुक्यातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना असतात.त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नाही.
तसेच जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामे येत असतात, ते सर्व प्रलंबित राहत आहे. पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसल्याने मुळशी पंचायत समितीचा कारभार नीट हाताळला जात नाही.
अडीच वर्षे पूर्ण झाली तरी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूका राजकीय उदासीनतेमुळे झालेल्या नाहीत. प्रशासकच पंचायत समितीचा कारभार सांभाळत आहेत. त्यात अनेक नागरिकांना विविध गोष्टींपासून मुकावे लागत आहे. तर त्याखालील सरकारी कर्मचाऱ्यांचीही मनमानी कारभार करत आहेत. प्रशासनात सुसूत्रता नसल्या कारणाने सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.
मुळशीत गटविकास अधिकारी पूर्ण वेळ नसल्याने ग्रामसेवक तसेच पंचायत समितीतील कर्मचारी यांच्यावर कोणाचाही वचक नसून ते मनमानी कारभार करत आहेत. तरी मुळशीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख स्वाती ढमाले यांनी केली आहे.
मुळशी,मावळला सहाय्यक पद रिक्तच…
पंचायत समिती मुळशी व पंचायत समिती मावळ या दोन्ही ठिकाणी सहाय्यक गटविकास अधिकारी हे पद रिक्त आहे. त्यामूळे या दोन्ही कार्यालयाचे कामकाज करताना अडचणी निर्माण होत असून दोन्ही तालुक्यांकडील पदाधिकारी यांना वेळ देता येत नाही.
तरी माझेकडील गट विकास अधिकारी, पंचायत समिती मावळ या पदाचा अतिरिक्त पदभार कमी करावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनीच केलेली आहे.
गेली अडीच वर्षे होते प्रशासक राज
गेली अडीच वर्षे मुळशी तालुक्यात प्रशासक राज आहे. त्यात गेले एक वर्ष अतिरिक्त गटविकास अधिकारी मुळशीचा कारभार बघत आहेत. जानेवारीत मुळशीला गटविकास अधिकारी मिळाले. मात्र, त्यांच्याकडे मावळाचाही पदभार ठेवला.
स्वराज्य संघटनेकडून यासाठी वेळोवेळी आंदोलनेही झाली. मात्र, प्रशासनाकडून मुळशीकरांच्या तोंडाला नेहमी पाने पुसण्याचेच उद्योग केले जातात, अशी खरमरीत टीका स्वराज्य संघटनेचे पुणे जिल्हा निमंत्रक राजू फाले यांनी केली आहे.





