या वयात कुठलीही जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नाही – शरद पवार

मुंबई – 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून केंद्र सरकारने अनेक आश्वासने दिली. परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पंतप्रधानांनी देशातील जनतेला केवळ “अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. परंतु ते पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. तसेच छोट्या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवणे हाच भाजपचा अजेंडा आहे, असा दावा केला.
ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.राज्यात महाविकास आघाडी कोसळल्यानंतर शरद पवार हे ऍक्शन मोडवर आले आहेत. शरद पवार म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने याआधी देशवासियांना दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली नाहीत.
माणसं फोडणे, साधणांचा वापर करणं आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गंभीर चित्र या देशासमोर आज दिसत आहे. राज्यांमध्ये सत्तेवर येण्यासाठी ते तपास यंत्रणांचा गैरवापर करतात, असा दावा करत त्यांनी भाजपवर टीका केली.
गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला हे संपूर्ण देशाला माहित आहे. त्यामधे सेशन कोर्ट, उच्च न्यायालय, आणि सर्वोच्च न्यायालय यांनी कठोर शिक्षा दिली. आजन्म कारावास देण्यात आला होता. त्यानंतर ती जन्मठेपेत वर्ग केली. आता गुजरात सरकारने त्यांना सोडले आणि त्यांचा जाहीर सत्कार केला, असे पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 15 ऑगस्टचे भाषण ऐकले, त्यामधे स्त्री वर्गाबाबत ते बोलले. मात्र, त्यांच्याच राज्यांत महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आले. 2014 मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिनची घोषणा केली होती. किंमती कमी होतील बोलेले होते. त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना जाणवले नाहीत, असे पवार म्हणाले.
या वयात कुठली जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नाही
राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात इतर पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मी केवळ मदत करणार आहे. या वयात कुठली जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देण्याच्या उद्देशातून एकत्र येण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्नशील आहेत. मात्र, विरोधकांची आघाडी झाल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्नही सातत्याने पुढे येतो. संभाव्य उमेदवारांमध्ये पवार यांचेही नाव घेतले जाते. त्या पार्श्वभूमीवर, त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे. (There is no desire to accept any responsibility at this age – Sharad Pawar)





