पुणे | धनुर्वाताचे इंजेक्शनच नाही

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दैनंदिन काम करताना काही कापले अथवा एखाद्या प्राण्याने चावा घेतल्यास महापालिका रूग्णालयात धनुर्वाताचे इंजेक्शन घेण्यासाठी गेलेल्या रूग्णांना थेट खासगी रूग्णालयात पाठविले जात आहे. शासनाकडून गेल्या सहा महिन्यांपासून हे इंजेक्शनच आलेले नाहीत. तर, महापालिकेने शासन पुरवठा करत असलेले इंजेक्शन खरेदी करता येत नाही, असे कारण देत या इंजेक्शनची खरेदीच केलेली नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
महापालिकेकडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी शहरात दवाखाने तसेच रूग्णालये चालविली जातात. या ठिकाणी प्रामुख्याने कामगार तसेच कष्टकऱ्यांसाठी नाममात्र दरातील ही वैदकीय सेवा महत्वाची ठरते. राज्यशासनाकडून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अनेक इंजेक्शन तसेच औषधांचा पुरवठा महापालिकेस केला जातो.
त्यात, घटसर्प तसेच धनुर्वाताचे एकत्रित इंज़ेक्शन पुरविले जाते. मात्र, शासनाकडून गेल्या सहा महिन्यांपासून अनेक औषधांचा नियमित पुरवठा होत नाही त्यात धनुर्वाताच्या इंजेक्शनचाही समावेश आहे.
नारायण पेठेतील रुग्णालयात…
नारायण पेठ परिसरातील एका बांधकामावर काम करणाऱ्या मजूराच्या मुलाला उंदीर चावला तसेच त्याठिकाणी या मुलाला लोखंडामुळे कापले गेले. हा मजूर मुलाला घेऊन नारायणपेठेतील महापालिकेच्या माळवे दवाखान्यात गेला. मात्र, इंजेक्शन नसल्याचे सांगत या मुलाला पालकांसह गाडीखाना येथील पालिकेच्या सेंट्रल स्टोअरमध्ये पाठविण्यात आले.
मात्र, त्या ठिकाणीही इंजेक्शन नसल्याचे सांगत खासगी रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, संबंधित कामगार हा बांधकाम मजूर असल्याने त्याला मोठा आर्थिक भार उचलावा लागला.
महापालिकेच्या रूग्णालयात सर्वसामान्यांसाठी औषधे उपलब्ध असणे गरजेचे आहे. हा प्रकार माझ्या समोर घडला, संबंधित व्यक्ती बांधकाम मजूर असल्याने तो महापालिकेच्या रूग्णालयात आला होता. त्यामुळे महापालिकेने तातडीने सर्व रूग्णालयात आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावित. – रूपेश केसेकर, सामाजिक कार्यकर्ते




