कर्नाटकात कोणाशीही युती नाही – देवेगौडा

बेंगळुरू – कर्नाटकात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जेडीएस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.
माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे प्रमुख एचडी देवेगौडा यांनी शनिवारी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्ष कर्नाटकातील कोणत्याही राजकीय पक्षासोबत निवडणूकपूर्व युती करणार नाहीं असे स्पष्ट केले आहे. हा पक्ष भाजपबरोबर निवडणूक पुर्व आघाडी करेल असे सांगितले गेले होते.
देवेगौडा म्हणाले की आम्ही वेळप्रसंगी विरोधी पक्षात बसून पक्ष मजबुतीचे काम करू पण राज्यात कोणाशीही आघाडी केली जाणार नाही. कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणूक अजून बऱ्याच लांब असल्या तरी त्या राज्यात आत्तापासूनच निवडणूक हालचाली सुरू झाल्या आहेत.
पाच राज्यांतील निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांचा पक्ष भाजपशी आघाडी करेल अशीही चर्चा सुरू झाली होती. त्याचे देवेगौडा यांनी आज स्पष्ट शब्दात खंडन केले आहे.





