पुणे जिल्हा | आयुष्यात खूप काही घडवायचंय; जनतेने आशीर्वाद द्यावे

इंदापूर, (प्रतिनिधी) – कर्मयोगी शंकररावजी पाटील ऊर्फ भाऊंनी 1995 मध्ये नवीन पिढीचे नेतृत्व करण्याची संधी दिली. भाऊंचा विश्वास सार्थ ठरवित 20 वर्षात इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास केला व राज्यात तालुक्याचे नाव मोठे केले. कार्यकर्त्यांचे व जनतेचे प्रेम कधीही विसरणार नाही.
आयुष्यात खूप काही घडवायचंय ; त्यामुळे जनतेने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शहाजीनगर येथे केले.
शहाजीनगर येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम प्रसंगी सत्काराला उत्तर देताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 61 किलोचा गुलाबाचा हार घालून, 61 किलोचा केक कापण्यात आला.
यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अंकिता पाटील ठाकरे, विलासराव वाघमोडे, डॉ. लक्ष्मण आसबे, तानाजीराव नाईक, अमित गायकवाड, विजयकुमार बाजीराव पाटील, भाग्यश्री पाटील, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, मयूरसिंह पाटील, दत्तात्रय शिर्के, विकास पाटील, किरण पाटील, मनोज पाटील, अमरसिंह पाटील,
दत्तू सवासे, अनिल पाटील, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, प्रसाद पाटील, संजय बोडके, प्रकाश मोहिते, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, कमाल जमादार, दत्तात्रय पोळ, सुरेश मेहेर, विक्रम कोरटकर आदींसह पदाधिकारी, सरपंच, गावोगावचे कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचा कार्यक्रम सकाळी 9 ते 4 असा तब्बल 7 तास चालला. कार्यक्रमास कार्यकर्त्यांची न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, मी जीवनात संघर्ष केला व यशस्वी झालो, होत आहे. सत्तेवर असताना नीरा -भीमा कारखाना, दूध संघ अशा अनेक सहकारी संस्था उभा केल्या. इंदापूर तालुका हा विकास कामांमध्ये राज्यात अग्रभागी ठेवला.
संघर्षातून माणूस घडतो, समाजात जो सातत्याने लोकांसाठी काम करतो. त्यांच्या मागे समाज उभा राहतो. गेली 10 वर्षांमध्ये संवैधानिक पदावर नाही, तरीही जनतेचे प्रेम कायमच आहे, असे भावनिक उद्गारही त्यांनी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर निलाखे व कालिदास आव्हाड यांनी तर कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी आभार मानले.
हे प्रश्न सोडवायचेय
आगामी काळात इंदापूर तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे, 22 गावांचा प्रश्न, दोन्ही नदीवरील बंधारे दुरुस्ती व आधुनिकीकरण, शेटफळ तलाव असे शेतीच्या पाण्याचे प्रश्न शिस्तबद्ध नियोजन करून सोडवायचे आहे, तेवढी ताकद आता आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे, त्यामुळे जनतेने चिंता करण्याची गरज नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
केले भावनिक आवाहन
विधानसभा निवडणुकीला 2 महिने वेळ आहे, त्यावेळेची राजकीय परिस्थिती काय राहील हे अजून सांगता येत नाही. जनता श्रेष्ठ आहे, जनतेच्या मनात असेल तेच घडेल, त्यामुळे जनतेने आशीर्वाद द्यावेत, असे भावनिक आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणामध्ये केले.
तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही मान्य करू…
वाढदिवस कार्यक्रम चालू असताना विकास आघाडीचे शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते वाजत गाजत हजर झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आमचे ठरलय…विकास आघाडी…अशा घोषणाबाजी केली. त्याचा संदर्भ घेत अंकिता पाटील ठाकरे यांनी भाषण सांगितलेले की, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही मान्य करू. त्यावरती टाळ्यांचा कडकडाट झाला.
हर्षवर्धन पाटील विधानसभेत असणार!
या कार्यक्रमात बोलताना प्रत्येक वक्त्याने विधानसभा निवडणुकीच्या संदर्भ देत आमचे ठरलंय.. हर्षवर्धन पाटील विधानसभेत आमदार असणारच..! आम्ही जीवाची रान करू व हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवू… असा ठाम निर्धार व्यक्त केला.





