केजरीवाल दहशतवादी असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध – प्रकाश जावडेकर

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. केजरीवाल हे दहशतवादी असल्याबद्दलचे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ जावडेकर यांनी एकापाठोपाठ एक काही उदाहरणेही दिली. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने शाहिन बागेतील आंदोलनाचे समर्थन केले आहे. याशिवाय आसामचे भारतापासून विभाजन करणे, स्वातंत्र्याबाबतची जिनांची कल्पना, जिथून भारताला विभाजित करण्याच्या घोषणा दिल्या जातात, त्यांचे समर्थन करणे म्हणजे देखील दहशतवादच आहे, असे जावडेकर म्हणाले.
केजरीवाल आज निरपराध चेहऱ्याने वावरत आहेत. आपण दहशतवादी आहोत का, अशी विचारणाही ते करत आहेत. मात्र ते खरोखरच दहशतवादी आहेत. हे सिद्ध करणारे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. आपण अराजवादी आणि दहशतवादी असल्याचे केजरीवाल यांनी स्वतःच म्हटले आहे, असे जावडेकर म्हणाले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंजाबमधील निवडणुका आठवड्यावर आल्या असताना मोगा इथे खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी केजरीवाल रात्रभर मुक्काम केला होता. पत्रकारांनी चौकशी केल्यावर आपण अशाच लोकांकडे राहू, असे केजरीवाल म्हणाले होते, याची आठवणही जावडेकर यांनी करून दिली. आपचे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले. “आप’कडून शाहिन बागेतील आंदोलनाचे समर्थन करण्यावरही जावडेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.





