Chief Justice Bhushan Gavai – भारतीय न्यायालयीन व्यवस्थेच्या आव्हानांबद्दल चिंता वाटत असून देशाची न्यायालयीन व्यवस्था सुधारण्याची मोठी गरज आहे. आपल्या देश आणि न्यायालयीन व्यवस्थेला अनेकदा विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे असे प्रतिपादन सरन्यायाधिश भूषण गवई यांनी केले. हैदराबादमधील नालासर लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्या. पी. एस. नरसिंह यांनीही या दीक्षांत समारंभात हजेरी लावली. तेलंगणा हायकोर्टाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्यायाधीश सुजॉय पॉल हे या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष होते. न्या. गवई म्हणाले की, ‘मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, अनेक प्रकरणांमध्ये सुनावणीला लागणारा विलंब कधीकधी दशकांपर्यंत टिकू शकतो. आम्ही अशी प्रकरणे पाहिली आहेत की, जिथे निष्पापपणे कैदी म्हणून तुरूंगात काळ व्यतीत केल्यानंतरही सदर व्यक्ती निर्दोष आढळला आहे. अशा वेळी त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातील उमेदीची वर्षे गुन्हा नसताना कारागृहात घालवली असतील, तर त्यावर आता विचार होणे गरजेचे आहे’.