Mallikarjun Kharge : …यापेक्षा अधिक बेजबाबदार वक्तव्य असू शकत नाही; भाजपचा खर्गेंवर पलटवार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा कथितपणे रद्द केल्याविषयीच्या वक्तव्याबद्दल कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर भाजपने जोरदार पलटवार केला. यापेक्षा अधिक बेजबाबदार वक्तव्य असू शकत नाही, असे त्या पक्षाने म्हटले.
खर्गे विसंगत स्वरूपाची वक्तव्ये करत आहेत. एकीकडे ते सर्वपक्षीय बैठकीत बोलताना आम्ही देशासोबत उभे असल्याचे म्हणतात. तर, दुसरीकडे देशाला कमजोर बनवण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या स्थितीत मोदींविषयी असे काही बोलणे अतिशय दुर्दैवी आणि यातनादायी आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कॉंग्रेसचे काही नेते वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यांना आवर घालण्याऐवजी खर्गेही तशा नेत्यांच्या ब्रिगेडमध्ये सामील झाले, असे टीकास्त्र भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सोडले.
भाजपच्या इतर काही नेत्यांनीही खर्गे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. दहशतवादविरोधी लढ्यात संपूर्ण देश मोदींसोबत उभा राहिला आहे. अशावेळी कॉंग्रेस राजकारण करण्यात मग्न आहे. खर्गे यांनी केलेले वक्तव्य अनावश्यक स्वरूपाचे आहे. ते वक्तव्य सुरक्षा दलांचे मनोधैर्य कमी करणारे आहे, अशा प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून देण्यात आल्या.





