पिंपरी | महामार्गाच्या सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे

हिंजवडी, (वार्ताहर) – पुणे पिंपरी चिंचवड मधून महामार्गाला जोडणार्या सेवा रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी व त्यामुळे पडलेल्या खड्ड्यातून वाट काढताना आयटीयन्सच्या नाकी नऊ आले आहेत.
पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असली तरी वाकडच्या हद्दीतील सेवा रस्ता दलदलीचा झाला आहे.परिणामी वाहतुकीचा वेग मंदावला जात असून दिवसभर होणार्या वाहतूक कोंडीने नागरिक वैतागले आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये विविध संस्था कार्यरत आहेत. येथील काही भाग हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत येतो तर सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) पीएमआरडीए व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी प्रशासकीय यंत्रणांच्या अधीपत्याखाली अनेक रस्ते आहेत.
मात्र यां सर्व प्रशासकीय संस्थात असणार्या समन्वयाच्या अभावाचा फटका नागरिकांना बसत आहे. हिंजवडी आयटी पार्क मधून वाकड, बाणेर, पुण्याला महामार्गावर ये-जा करण्याकरिता चार-पाच किमी अंतरासाठी तब्बल दीड ते दोन तास मोजावे लागत असल्याने कोंडीच्या मनस्तापाबरोबर या भागातून प्रवास करणार्या अनेक प्रवाशांना विविध व्याधीनी ग्रासले आहे.
आयटी उद्यानाकडे जाणार्या वाकड, ताथवडे, पुनावळे, माण, मारुंजी, हिंजवडी, लक्ष्मी चौक, कस्तुरी चौक, नेरे, जांबे, भागातील प्रमुख व सेवा रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, यामुळे नागरिक संतप्त झाले असून नित्याने प्रवास करणारे आयटी कर्मचारी देखील हैराण झाले आहेत.
पावसात गंभीर समस्या बनलेल्या खड्ड्याकडे येथील सर्वच प्रशासकीय संस्थांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. सर्वत्र खड्डेच-खड्डे झाल्याने रस्ता दिसणे दुरापास्त झाले आहेत. त्यामुळे सर्व रस्त्यांवर खड्डेच खड्डे ..गेला रस्ता कुणीकडे.. असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
आयटी पार्कमध्ये अनेक रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडलेत. या रस्त्यातून वाट काढताना मोठी दमछाक होत आहे. कोंडीचा सामना करावा लागतोच त्याशिवाय दुचाकीवाहन खडड्यात आदळत असल्याने कंबरदुखी पाठ दुखी मणक्याचे विकार जडले आहेत.
काही किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी दोन दोन तासापेक्षा अधिक वेळ लागतो त्यामुळे कंपनीत पोचून देखील काम करण्याची मानसिकता उरत नाही. – मोनिका जोशी,आयटी कर्मचारी
महामार्ग व सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे . मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे जाणवत आहे.
महापालिका कक्षेतील दोन्ही बाजूंचा सेवा रस्ता करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने ना हरकत दाखला दिल्यास महापालिका यावर तत्काळ निधी टाकून काम करण्यास तयार आहे. परंतु महामार्ग प्राधिकरणातील अधिकार्यांच्या अडमुठीपणामुळे नागरिकांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. -राहुल कलाटे,माजी गटनेते पिंपरी चिंचवड महापालिका
अशास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजविण्याचे काम
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील रस्ते बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले असले, तरीदेखील हे खड्डे योग्य प्रकारे बुजविले जात नसल्याचे दिसून आले आहे.
खडड्याच्या आकारमानानुसार त्यामध्ये मोठे दगड व सिमेंट ब्लॉकटाकून सिंमेंट खडीचे मिश्रण व काही ठिकाणी मुरूम टाकून ते बुजविले जात आहेत. मोठ्या पावसाची सर हे खड्डे पुन्हा खुले करत आहे.





