Satara | लोकसभेला विरोधी काम करणारे महायुतीचे घटक नाहीत

सातारा, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीत रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. दीपक चव्हाण यांनी काय केलय ते सर्वांना माहित आहे. माढा मतदारसंघात भाजपाचा पराभव होण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते युतीचे घटक आहेत असे आम्ही मानत नाही असे सांगत आ. जयकुमार यांनी आ. रामराजे नाईक निंबाळकर आणि सहकाऱ्यांवर निशाणा साधला.
लोकसभा निवडणूकीत आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध दर्शवला होता.
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या समोर हे प्रकरण गेले होते. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी महायुतीत असूनही विरोधी गटाशी जवळीक साधली होती.
त्यातच आता विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. अगदी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही असे वक्तव्य रामराजेंनी केले आहे.
त्यातच परवा रामराजेंच्या सभेत ना. अजित पवारांनी आ. दीपक चव्हाणांची उमेदवारी मोबाईलवरुन बोलत जाहीर केली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीने विधानसभा निवडणूकांसाठी आत्तापर्यंत कोणताही उमेदवार जाहीर केला नाही. फलटणची उमेदवारी कशी जाहीर केली ते माहित नाही.
लोकसभा निवडणूकीत रामराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांनी काय केलय ते सर्वांना माहित आहे. फलटणमध्ये ज्यांचे तिकिट जाहीर झालेय ते ज्यांनी जाहीर केलय ते त्यांच्याकडून लढतील की नाही याबाबत शंका आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव होण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते महायुतीचे घटक आहेत असे आम्ही मानत नाही, असेही आ. गोरेंनी सांगितले.




