satara | जिल्ह्यात सी व्हिजील अॅपवर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी

सातारा, (जिमाका): लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता सुरु असून निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सी व्हिजील या मोबाईल अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अँड्राईड मोबाईल प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे.
मतदानातील गैरप्रकार अथवा आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेच्या तक्रारी नागरिकांना सी व्हिजील अॅपद्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येतात. तक्रारीनंतर 100 मिनिटांत यावर कार्यवाही करण्यात येते. एखाद्या गैरप्रकाराचा फोटो किंवा व्हिडीओ घेवून आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाची तक्रार या पद्वारे करता येते.
सातारा जिल्ह्यात या सी व्हिजील अॅपवर आतापर्यंत एकूण 27 विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून या सर्वांवर विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल हे विविध प्रकाराच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी तयार केलेले पोर्टल आहे.
या पोर्टलवर नागरिकांच्या तक्रारींचे सर्वसमावेशक रेकॉर्ड, त्याला दिलेला प्रतिसाद, करण्यात आलेली कार्यवाही या सर्वांची माहिती ठेवण्यात येते. नागरिक या पोर्टलवर देखील मतदार नोंदणी, मतदान केद्रांची ठिकाणे, इव्हीएम, निवडणूक खर्च, पैशाची अवैध देवाण घेवाण आदीबाबत माहिती देता येते अथवा तक्रार करता येते. जिल्ह्यात या पोर्टलवर आचारसहिंता कालावधीत आतार्पंत विविध प्रकारच्या एकूण 74 तक्रारी तर, 52 लोकांनी माहिती विचारण्यासाठी वोटर हेल्पलाईनवर फोन केले व त्यावर दिलेल्या माहितीने ते समाधानी झाले.





