…तर स्थिती हाताळता येऊ शकणार नाही; शेतकरी आंदोलकांचा इशारा

चंदिगढ – शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावल्याने शेतकरी आंदोलकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यातून त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला. डल्लेवाल यांच्याबाबत काही अनुचित घडल्यास नंतर उद्भवणारी स्थिती हाताळता येऊ शकणार नाही, असा निर्वाणीचा संदेश त्यांनी दिला.
पंजाब-हरियाणा सीमेवर ७० वर्षीय डल्लेवाल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दीड महिन्यापासून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलकांनी आक्रमक भूमिका मांडली. आगामी काळात स्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारशी चर्चा करण्याची इच्छा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, सरकारकडून प्रतिसाद आला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विविध मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या फेब्रुवारीत दिल्लीकडे कूच सुरू केले. मात्र, त्यांना सुरक्षा दलांनी पंजाब-हरियाणा सीमेवर रोखले. तेव्हापासून ते सीमेवरच मुक्काम ठोकून आहेत. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी, अशी शेतकरी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याची ठाम भूमिका डल्लेवाल यांनी घेतली आहे.





