‘…तर काळाराम मंदिराचे शुद्धीकरण करावे लागेल’; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरून राम कदमांचा हल्लाबोल

Kalaram temple – उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहता त्यांनी काळाराम मंदिरात जाणार असल्याचे जाहीर केले होते. यासंदर्भात भाजपचे नेते राम कदम यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. कदम म्हणाले, ठाकरेंनी पहिल्यांदा प्रभू श्रीरामांविषयी अपशब्द बोलणाऱ्यांना खडेबोल सुनवायला हवे.
प्रभू राम काल्पनिक आहेत म्हणून पुरावे मागणाऱ्यांचे त्यांनी कान टोचायला हवे. तरच त्यांना मंदिरात प्रवेश द्यावा अन्यथा त्यांच्या प्रवेशानंतर मंदिरात गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करावे लागेल. त्यामुळे ठाकरेंना मंदिरात येण्यापासून रोखावे, असे पत्र राम कदम यांनी काळाराम मंदिरातील पुजाऱ्याला लिहिले आहे.
श्रद्धा आणि आस्थेप्रमाणे मंदिरात दर्शन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याबाबत दुमत नाही, मात्र प्रभू श्रीरामावर श्रद्धा असणारा माणूस प्रभू श्रीरामांना कोणी मांसाहारी, मदिरापान करणारा म्हणत असेल.
प्रभू राम काल्पनिक आहे, असे सांगून प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाचे पुरावे मागत असेल. तर कोणीही रामभक्त ऐकून घेणार नाही, त्याचे खंडन करून निषेध करेल, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील राम कदम यांनी निशाणा साधला.
ठाकरेंची रामभक्ती कुठे गेली?
तसेच प्रभू श्रीराम यांना अपशब्द बोलले जात असताना ठाकरे यांची रामभक्ती कुठे गेली होती? असा सवाल देखील कदम यांनी विचारला आहे. रामावर अनेकजण अपशब्द बोलत आहेत, त्यांना खडेबोल न सुनवता ठाकरे गप्प बसलेत. खरा रामभक्त हा अशा लोकांना नक्कीच उत्तर देणार. त्यामुळे आता राम कदमांनी थेट उद्धव ठाकरेंवर शंका उपस्थित केली आहे.
नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन
शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेऊन रामकुंडावर महाआरती करणार आहेत. याबाबत नाशिककर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराच्या प्रशासनाने देखील ठाकरे यांच्या स्वागताची तयारी केली आहे.





