…तर महाविकास आघाडीचा डोलारा ढासळेल; राजू शेट्टींचे पवारांना पत्र

कोल्हापूर – राज्यातील जनतेला महाविकास आघाडी सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण हळूहळू त्या अपेक्षांना तडे जात आहेत. शेतक-यांच्या कर्जमाफीचा एक मुद्दा सोडल्यास अन्य कोणत्याही गोष्टी होताना दिसून आल्या नाहीत. महाविकास आघाडील्या पाठिंबा देणा-या पक्षांना आज किंमत दिली जात नाही.
महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्यांने या सर्व गोष्टी वेळीच न सावरल्यास महाविकास आघाडीचा डोलारा ढासळेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
यासंदर्भात त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराविषयी खासदार शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात नमुद केले आहे की, महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून या छोट्या पक्षाबरोबर एकही बैठक झालेले नाही. मात्र त्याच काळामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतले गेले. हे निर्णय घेताना छोट्या पक्षांनी हयातभर संघर्ष केला त्यांचे मतही विचारात घेतले नाही.
महापूर व अतिवृष्टीमध्ये प्रचंड नुकसान झालेल्या शेतक-यांना तुटपुंजी मदत जाहीर करून वा-यावर सोडले गेले. तसेच राज्यात सध्या विजेची टंचाई आहेच. याशिवाय विजेचे दरही इतर राज्याच्या तुलनेने प्रचंड आहेत. अशा परिस्थीतीमध्ये जलसंपदा विभागाने त्यांच्या ताब्यात असणा-या जलाशयातील विज निर्मीतीची केंद्रे महाजनकोकडे असलेली मुदत संपल्यानंतर खासगी कंपन्यांना भाड्याने देण्याचा घाट घातलेला आहे.
महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या वाईन निर्मीती प्रकल्पांना राज्य सरकारचे अनुदान व कर्जाला सरकारची हमी हवी होती म्हणून किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचे धोरण जाहीर करून विनाकारण शेतक-याला बदनाम केले गेले.
आम्ही या महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहोत म्हणून या सर्व गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्यावे, असे वाटले. म्हणून या सर्व गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्या, असे शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे.





