Balasaheb Thorat on Santosh Deshmukh Case | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीकडून १५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या करण्यात आली आहे. हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जे आरोप आणि दावे वाल्मीक कराडबद्दल केले जात होते, ते पोलिसांनी तपासाअंती दाखल केलेल्या आरोपपत्रात सत्य ठरवण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली आणि वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून हे हत्याकांड घडल्याच्या दाव्यांना आरोपपत्रातून पुष्टी मिळाली आहे. तर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे सोपावण्यात आले आहे. यावर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये वाल्मिक कराड दोषी असेल, मास्टरमाईंड असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. बीड घटनेप्रकरणात जे कोणी सहभागी असतील, तर त्यांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे की, गुन्हेगाराला दहशतच निर्माण झाली पाहिजे,” असे त्यांनी म्हटले. मुंडे – कोकाटे राजीनाम्याबाबत काय म्हणाले बाळासाहेब थोरात? मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, “धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र योग्य निर्णय त्यांनी घेणं आवश्यक आहे. काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर राजीनामे घेतले गेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झाले आहेत. हा विषय नितीमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे,”अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हेही वाचा: Nagar : कर भरण्यासाठी वसुली विभाग सुट्टीच्या दिवशी चालू