पुणे- गेल्या दोन आठवड्यांपासून करोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण राज्याच्या आरोग्य खात्याने नोंदवले आहे. ही संख्या अशीच राहिली तर पुन्हा एकदा मास्क आदी निर्बंध लावावे लागतील, असा इशाराही आरोग्य खात्याने दिला आहे. मुंबईनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात ही वाढ दिसून येत आहे. दिल्ली आणि राजस्थानात सध्या मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळत आहेत. या दोन राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णवाढ धीमी असली तरी ती वाढतेय, ही चिंतेची बाब आहे. राज्यात पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट अतिशय सौम्य होती. या लाटेमध्ये करोनाचे रूप हे ओमायक्रॉन होते. सौम्य लक्षणांवर ही लाट तरली. मार्चपासून बाधितांची संख्या कमी होत गेली. परंतु 18 एप्रिलपासून पुन्हा एकदा बाधित संख्या वाढीला सुरूवात झाली आहे. 11 ते 17 एप्रिलमध्ये 367 रुग्ण संख्या होती. तर 18 ते 24 एप्रिलदरम्यान ही संख्या 937 झाल्याचे आरोग्य खात्याने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. त्यानुसार सर्व विभागांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य आरोग्य खात्याचे निरीक्षण… *दररोज दीडशे ते पावणेदोनशे रुग्ण आढळत आहेत. ही संख्या फार मोठी नाही. *करोना संसर्गाचा दर अद्यापही एक टक्क्यापेक्षा कमी आहे. *सर्व निर्बंध हटवून पाच आठवडे झाले. त्यानंतरही रुग्णसंख्येत मोठी वाढ नाही. *करोना संसर्ग झालेल्या 95 टक्के रुग्णांना कोणतीही तीव्र लक्षणे नाहीत. काय काळजी घ्यावी? *राज्यात मास्कसक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा *गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा *नागरिकांनी करोना संसर्गाबाबत हलगर्जीपणा करू नये *करोना प्रतिबंधक लस घ्यावी *वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावे *सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे. राज्यातील करोनाच्या रुग्णसंख्येकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सौम्य वाढ असली, तरीही त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याची परिस्थिती नाही – डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण प्रमुख, सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य