‘…तर राजीनामा द्या नाही’, छगन भुजबळांची मंत्रिमंडळात एन्ट्री अन् ठाकरेचे गटाचे शिंदेंना आव्हान

Chhagan Bhujbal and Eknath Shinde | अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला. भुजबळ फार्म बाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडत आनंद साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात समर्थकांनी ठेका धरल्याचेही पाहायला मिळाले. मात्र आता ठाकरे गटाच्या ‘सामना अग्रलेखा’तून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांबाबत आदर असेल तर राजीनामा द्या, असा सल्ला देण्यात आला आहे.
काय लिहिले ‘सामना’ अग्रलेखात ?
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मात्र, आता त्याच छगन भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तेव्हा आता एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे, असा उल्लेख सामनामध्ये करण्यात आला आहे.
‘चक्की पिसायला पाठवणार, फडणवीस बोलत होते’
छगन भुजबळ यांच्या काही घोटाळ्यासंदर्भात स्वतः फडणवीस यांनीच आवाज उठवला होता. अजित पवार यांना देखील तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चक्की पिसायला पाठवू अशी फडणवीस यांची ललकारी होती. भुजबळ व अजित पवार यांची जागा तुरुंगातच आहे व अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री ठाकरे बसतात यास काय म्हणावे? त्यामुळे ठाकऱ्यांचे सरकार आम्ही खेचणार व भुजबळ, अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणार, असे फडणवीस रोज बोलत होते.
भुजबळ निर्दोष मुक्त झालेले नाहीत, फक्त जामिनावर सुटले आहेत याचाही उल्लेख फडणवीस जाणीवपूर्वक करीत असत. मात्र आज चित्र असे आहे की, भुजबळ आणि अजित पवार हे दोघे नेते त्यांच्या ऐतिहासिक मांडयांसह फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व भाजपचे लोक त्यांच्या मांड्यांना ‘देवेंद्ररतन’ तेल चोळून भ्रष्टाचाराचा पाया मजबूत करीत आहेत, अशी टीका ‘सामना अग्रलेखा’तून करण्यात आली आहे.
एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला तुरुंगात पाठवायचे, त्याच्या मांडीला मांडी लावून कधीच बसणार नाही, असे बोंबलायचे. नंतर मात्र सत्तेसाठी त्यांनाच पक्षात घेऊन लोकांना मूर्ख बनवायचे हा भाजपचा धंदा आहे. भुजबळ यांच्यावर ईडीने व किरीट सोमय्यासारख्या भुक्कड लोकांनी आरोप केले. अर्थात किरीट सोमय्याला असे आरोप करून भुजबळांचा छळ करण्याची प्रेरणा फडणवीस वगैरे लोकांचीच होती. आता हाच भुक्कड किरीट सोमय्या भुजबळांच्या मांडीवर थाप मारताना दिसेल, असे म्हणत सोमय्यांच्यावर देखील निशाणा साधण्यात आला. Chhagan Bhujbal and Eknath Shinde |
‘शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या’
शिंदे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता मिंधे यांची अशी कोंडी अमित शहा व फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. Chhagan Bhujbal and Eknath Shinde |
हेही वाचा:





