… तर नाटो फौजा युध्दात उतरतील; अमेरिकेचे रशियाला इशारा

वॉशिंग्टन – युक्रेनवर रशियाने रासायनिक अस्त्रांचा वापर केल्यास नाटो फौजा या युध्दात उतरतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. त्यामुळे तिसऱ्या महायुध्दाचे ढग दाटले असल्याचे मानले जात आहे.
रशियानें युक्रेनवर आक्रमण करण्याला महिना उलटला आहे. रशिया माघार घ्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवरे युक्रेनच्या बाजूने देखील आंतरराष्ट्रीय पाठिंबा तयार होत आहे. अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला असून यामध्ये शस्त्रास्त्रांची देखील मदत केली जात आहे.
जो बायडेन यांनी गुरुवारी नाटो सदस्य राष्ट्रांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीत बायडेन यांनी रशियावर प्रदीर्घ काळासाठी निर्बंध घातले जाण्याचे समर्थन केलं. रशियाला जी-20 राष्ट्रांच्या समूहातून हाकलून लावण्याचा देखील प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितलं.
गेल्या महिन्याभरापासून युक्रेनला नमवण्यासाठी रशियन फौजा प्रयत्न करताना दिसत असून देखील युक्रेनचा लढा सुरूच आहे.
या पार्श्वभूमीवर रशियाकडून रासायनिक अस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ” जर पुतीन यांनी रासायनिक अस्त्रांचा वापर युक्रेनविरुद्धच्या युद्धात केला, तर आम्ही युद्धात उतरून त्यांना प्रत्युत्तर देऊ. ज्या पद्धतीने आणि प्रमाणात या अस्त्रांचा वापर होईल, त्याच पद्धतीने आणि त्या प्रमाणात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा बायडेन यांनी दिला आहे.
प्रदीर्घ काळासाठी निर्बंध!
दरम्यान, रशियावर प्रदीर्घ काळासाठी निर्बंध लादण्याची भूमिका बायडेन यांनी घेतली आहे. रशियावर निर्बंध दीर्घ काळासाठी लागू ठेवणं हे वेदनादायी असेल. मी नाटो राष्ट्रांची तातडीची बैठक याचसाठी बोलावली आहे की त्यातून सध्या सुरू असलेले निर्बंध दीर्घकाळ सुरू ठेवता यावेत, असे बायडेन यांनी नमूद केले.





