Vidya Balan : …तर AI कडूनच मुलं जन्माला घालून घ्या; कतरिनाच्या ट्रोलिंगवर विद्या बालनचा संताप
Vidya Balan : या ट्रोलिंगवर अनेक अभिनेत्रींनी नाराजी व्यक्त केली होती. आता अभिनेत्री विद्या बालननेही या प्रकरणावर संताप व्यक्त करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

Vidya Balan : आई झाल्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ काही काळ मनोरंजनविश्वापासून दूर होती. अलीकडेच ती पती विकी कौशलसोबत एका कार्यक्रमात आणि त्यानंतर लालबागच्या दर्शनासाठी दिसली.
या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कतरिनाच्या वाढलेल्या वजनावरून आणि बदललेल्या लूकवरून टीका करण्यास सुरुवात केली.
या ट्रोलिंगवर अनेक अभिनेत्रींनी नाराजी व्यक्त केली होती. आता अभिनेत्री विद्या बालननेही या प्रकरणावर संताप व्यक्त करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
‘AI कडूनच मुलं जन्माला घालून घ्या’; विद्या बालनचा ट्रोलर्सना टोला
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्या बालनने कतरिना कैफच्या लूकवरून झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केले. महिलांच्या शरीरावरून टीका करणाऱ्यांना सुनावताना तिने, ‘महिलांना मुलं झाल्यानंतर त्यांचं वजन वाढत असेल, तर AI कडूनच मुलं जन्माला घालून घ्या,’ अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
विद्या म्हणाली की, इतरांची निंदा करणं ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. दुसऱ्यांमध्ये दोष शोधण्यापूर्वी अशा लोकांनी स्वतःकडे पाहायला हवं. स्वतःबद्दल नाराजी किंवा मनातील कमतरतेची भावना यामुळे काही लोक इतरांवर टीका करत असतात, असेही तिने म्हटले.
प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात होतात अनेक बदल
विद्या बालन पुढे बोलताना महिलांच्या शरीरातील नैसर्गिक बदलांकडे लक्ष वेधले. प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित अनेक बदल होतात. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेच्या दिसण्यावरून तिची थट्टा करणे किंवा तिला ट्रोल करणे चुकीचे असल्याचे ती म्हणाली. विद्या बालनच्या या स्पष्ट भूमिकेमुळे महिलांच्या शरीरावरून केली जाणारी टीका आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंग यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.






