“…तर तुमच्या लेकीबाळींना देखील हिजाब घालण्याची वेळ येईल”; भाजप नेत्याचे धक्कादायक वक्तव्य

मुंबई : देशात मागील काही दिवसांपासून हिजाब बंदीच्या प्रकरणावरून एकच गदारोळ सुरु आहे. या मुद्द्यावरून देशात सध्या दोन गट निर्माण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून आता भाजपच्या एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “हातावर हात देऊन बसले राहाल तर तुमच्या लेकीबाळींवर देखील हिजाब घालण्याची वेळ येईल”, असे वक्तव्य भाजपचे नेते डॉ.अनिल बोंडे यांनी केले आहे.
वरुड-मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये विविध ठिकाणी भेट दिली त्यावेळी डॉ. बोंडे यांनी हे वक्तव्य केले. यावेळी वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस हे देखील उपस्थित होते. “आपण धार्मिक आहोत आणि भारत माता की जय म्हणतो” असा विचार करून शांत बसलात तर इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे हिजाब घालणे बंधनकरक आहे तशीच परिस्थिती पुढच्या तीस वर्षात आपल्या मुलींवर आली तर नवल वाटून घेऊ नका असे देखील डॉ. बोंडे म्हणाले आहेत.
अमरावती शहरात 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेमध्ये आम्ही होतो आणि आमच्या तरुणांनी समर्थपणे ताकद दाखवली. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले त्या ठिकाणची मंदिरं सुरक्षित राहिली इतर ठिकाणी मात्र मंदिराच्या बाजूला मस्जिद उभी झाली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपली मुलं मजबूत राहिली पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे असे आवाहनदेखील बोंडे यांनी केले.
यावर बोलताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी, अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करतो. त्यांचं वक्तव्य वादग्रस्त नाही तर विचार करायला लावणारं असल्याचे म्हटले तसेच सरकार शिवजयंती वर निर्बंध लादत आहे. मिरवणुका काढण्यावर निर्बंध लादले जात असतील तर आमच्या भगिनीवर हिजाब घालण्याची वेळ येईल, असे लाड म्हणाले.





