‘…तेव्हा औरंगाबादचं नाव बदललं असं मी मानणार ‘ – प्रकाश आंबेडकर

मुंबई – औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे “धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाने याचे श्रेय स्वःताह घेत भाजपसह शिंदे गटावर टीका केली आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे.
नामांतराच्या मुद्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना आपल मत मांडलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, ‘मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद हाय कोर्ट नाव तसंच ठेवलं आहे. ज्यादिवसी औरंगाबाद हायकोर्ट हे नाव बदलेल तेव्हा औरंगाबादचं नाव बदललं असं मी मानणार आहे.’ असं म्हणत त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
दरम्यान,या जिल्ह्यांच्या नामांतरासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर केंद्राने धाराशिवच्या नामांतरला तात्काळ हिरवा कंदील दाखविला होता मात्र, “छत्रपती संभाजीनगर’बाबत निर्णय प्रलंबित होता. माजी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शेवटच्या मंत्रीमडळ बैठकीत या नावांना मंजूरी दिली होती मात्र नव्या शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचा निर्णय रद्द करत नव्याने निर्णय घेतला होता.
उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत होता. 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम औरंगाबादचे “संभाजीनगर’ नामांतर करण्याची घोषणा केली होती. 1995 ला औरंगाबाद महापालिकेने हा ठराव घेतला होता. तत्कालीन मंत्रिमंडळाने अधिसूचनाही काढली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि नामांतरा विरोधात निकाल लागला. दरम्यानच्या कालावधीत युती सरकार गेल्याने हा मुद्दा लांबणीवर पडला.





