प्रभात वृत्तसेवा पुणे – पीएमपीएल बसची धडक बसून झालेल्या अपघातात एकुलता एक २२ वर्षीय अपंग मुलगा गमावलेल्याकुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती दावा निकाली काढत २० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. लोकअदालतीमध्ये न्यायाधीश सी. पी. भागवत आणि अॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर हा दावा निकाली निघाला. अर्जदाराचे वकील अॅड. विकी नवले आणि विमा कंपनीचे वकील अॅड. सुरेंद्र दातार यांनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.रोहन (नाव बदलेले आहे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अपंग होता. एका खासगी दुकानामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून तो काम करीत होता. काम करतानाच तो बीएडचे शिक्षण घेत होता. जून २०२४ मध्ये रोहन पुलगेट बसस्थानकात उभा होता. त्यावेळी बसस्थानकात चुकीच्या दिशेने आलेल्या बसचा त्याला धक्का लागला. या अपघतात रोहन मृत्युमुखी पडला. याप्रकरणी त्याच्या आई आणि वडिलांनी अॅड. विकी नवले यांच्यामार्फत पीएमपीएल आणि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध दावा दाखल केला होता. येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल झाला होता. याप्रकरणी पीएमपीएलतर्फे अॅड. अतुल गुंजाळ, इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. सुरेंद्र दातार यांनी काम पाहिले. “अपघातात गेलेला मुलगा परत मिळणार नाही. मात्र, मिळालेल्या नुकसनाभरपाईने त्याच्या आई-वडिलांचे जीवन जगणे सुखकर बनणार आहे. त्यामुळे दोघांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे.” – अॅड. विकी नवले, अर्जदारांचे वकील