Satara: मंगल कार्यालयातील साडेचार लाखांच्या चोरीचा 48 तासांत छडा
Satara आरोपीकडून चोरीतील तीन तोळे सोन्याचे दागिने व 36 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो फिर्यादीस परत देण्यात आला आहे.

Satara: सातारा शहरातील कोरेगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यादरम्यान झालेल्या साडेचार लाख रुपयांच्या चोरीचा सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या 48 तासांत छडा लावत बाळासो ऊर्फ अजित प्रकाश पाटील, (वय 27, रा. पुंगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील तीन तोळे सोन्याचे दागिने व 36 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो फिर्यादीस परत देण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जुलै रोजी दुपारी 12.10 ते 12.50 या वेळेत कोरेगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना हळदी समारंभाच्या गडबडीत अज्ञात चोरट्याने वधूपक्षाच्या खोलीत प्रवेश केला. खोलीतील पर्समधून तीन तोळे सोन्याचे दागिने आणि 36 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातून बाळासो ऊर्फ अजित प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीतील संपूर्ण सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. पोलिसांनी चोरीतील शंभर टक्के मुद्देमाल फिर्यादीस परत दिला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच डी.बी. पथक व सायबर पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी आणि कर्मचार्यांनी संयुक्तपणे केली.





