Shirur News : शिरुर तालुक्यातील या गावात कृषीपंपाचे चोरीचे प्रकार वाढले; शेतकऱ्यांची पोलिसांच्या कामकाजावर नाराजी

जांबूत : शिरूर तालुक्याच्या बेट भागातील शरदवाडी परिसरात मागील १५ दिवसांपूर्वी सुमारे दहा शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाचा गुरुवार (दि.१०) रोजी पहाटे जांबूत (ता. शिरूर) येथील कुकडीनदी काठावरील नवीन पुलानजीक असलेल्या सहा शेतकऱ्यांचे कृषीपंप चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सकाळी शेतकरी शांताराम जोरी हे कृषीपंप चालू करण्यासाठी गेले असता शेतकरी दत्तात्रय रामचंद्र जोरी, संपत भाऊ बदर, संपत शंकर कदम, नावजी जिजाबा जमदाडे, मारुती शंकर जोरी आदी शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची चोरी झाल्याचे त्यांचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. शरदवाडी (ता.शिरूर) येथील कृषीपंप चोरी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे याबाबत फिर्यादही दाखल करण्यात आली होती, मात्र पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पिडीत शेतकऱ्यांनी शिरूर पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
या आधीच्या काळात देखील पिंपरखेड, जांबूत , शरदवाडी, फाकटे आणि चांडोह परिसरात शेतकऱ्यांचे कृषिपंप , विद्युत रोहित्र ,केबल चोरी अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मागील एक वर्षापूर्वी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले यांनी योग्य कारवाया करत आरोपींना जेरबंद केले होते. मात्र तदन्तर अशा प्रकारे छोट्या मोठ्या चोऱ्या करून शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
सध्याच्या काळात शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम,ऊस लागवड आणि तरकारी लागवडीचा काळ चालू आहे.अशा काळात या घटना घडल्यास शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागत असून अशा प्रकारे शेतकऱ्यांशी निगडीत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा छडा लावून त्यांना जेरबंद करावे व कठोर शासन करावे अशी मागणी परिसरातील संतप्त शेतकरी करत आहेत.
बेट भागातील जांबूत आणि शरदवाडी परिसरात कृषीपंप चोरी आणि केबल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा विविध माध्यमातून शोध घेणे चालू आहे. लवकरच शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण करून त्यांना नुकसान पोहचविणाऱ्या गुन्हेगारांचा छडा लावून त्यांना जेरबंद करून कठोर शासन करण्यात येईल.
दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक ,शिरूर





