अहमदनगर : श्रीगोंद्याच्या युवकाने झाडावर बसविला गणपती : समीरण बा. नागवडे

श्रीगोंदा – गणेशोत्सवामध्ये अधिकाधिक आकर्षक सजावट करण्याची तरुणांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते. यावर्षी करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवाचा उत्साह काहीसा कमी असला, तरी तालुक्यातील कोरेगाव येथील तरुणाने झाडावर मंदिर बनवून गणेश मूर्तीची स्थापना करीत अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला आहे. सध्या झाडावर बसवलेला हा गणपती अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोरेगाव येथील राजन थोरात या तरुणाने हा अनोखा प्रयोग केला आहे. गेली पाच वर्षे कोरेगाव येथील काही युवक झाडावर गणपती बसविण्याचा अनोखा प्रयोग करीत आहेत. परंतु, यावर्षी करोनाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय झाल्याने यावर्षी झाडावर गणपती बसवणे या तरुणांना शक्य झाले नाही. परंतु, येथील साबळे मळा येथील राजन थोरात या तरुणाने घराशेजारी असणाऱ्या बाभळीच्या झाडावर गणपती बसवत त्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील केली आहे.
त्याने बाभळीच्या झाडावर वीस फूट उंचीवर लाकडी फळ्या वापरून गणपती बसवण्याएवढी जागा केली. त्याला कडेने कापड लावून मंदिराचा आकार देत आकर्षक सजावट केली. त्याचबरोबर या छोट्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली आहे. या मंदिरात राजन याने गणेश स्थापना केली असून, ही कल्पना चर्चेचा विषय बनली आहे. गणेशोत्सवात सजावटीसाठी वेगवेगळे देखावे, निरनिराळे प्रयोग केले जातात. परंतु, तालुक्यातील कोरेगाव येथील राजन याने चक्क गणपतीच झाडावर बसवत अनोखा प्रयोग केला आहे. राजन याने केलेला हा अनोखा प्रयोग चर्चेचा विषय ठरत असून, या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.





