अमानुष कृत्य ! तरुणाला अर्धनग्न करून लोखंडी रॉडचे चटके

जालना : जिल्ह्यातील भोकरदनमधील आन्वा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडी सळईने चटके देऊन त्याला अमानुष मारहाण करण्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.
याप्रकरणी मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कैलास बोराडे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड आणि सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी ट्वीट करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड अशी आरोपींची नावे आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या भावाने म्हणजे भागवतने कैलासला मारहाण केली. कैलास बोराडे एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी जुन्या वादातून आरोपी दौडने कैलाससोबत वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने कैलासला मारहाण करत तापलेल्या लोखंडी रॉडने चटके दिले.
याप्रकरणी पारध पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिवसेना ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, राजकीय हेतूने मला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नवनाथ दौड म्हणाले आहेत.
वर्षभरापूर्वी पाइपलाइनवरून झाला वाद
कैलास बोराडे व भागवत दौड यांचे शेत शेजारीशेजारी आहे. वर्षभरापूर्वी पाइपलाइन टाकण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून भागवतच्या डोक्यात कैलास विषयी राग होता. या वादातून संशयितांनी कैलासला रॉडने चटके दिल्याचा प्रकार घडला.
किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा
जालन्याच्या गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा झाला असून घटनेतील दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये राहात असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली
या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाला. दोन गटांतील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून, परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.





