इराणच्या अणू प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत जागतिक अणू उर्जा संस्थेला चिंता

न्यूयॉर्क – इराण आणि इस्रायलमध्ये भडकलेल्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर इराणच्या अणू प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय अणू उर्जा संस्थेने चिंता व्यक्त केली आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून देखील तशाच प्रकारचा हल्ला केला गेल्यास इराणच्या अणू प्रकल्पांची हानी होऊ शकते.
त्याचा परिणाम इराणसह सर्व प्रादेशिक भूभागाला सोसावा लागू शकतो. यामुळे ही चिंता व्यक्त केली गेली आहे. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी अत्यंत संयम बाळगण्याचे आवाहन आयएइएचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी केले आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या प्रचंड क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव इराणने आपली आण्विक सुविधा तात्पुरती बंद केली आहे, अशी महीती त्यांनी दिली.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी काल २४ तासांपेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा युद्ध मंत्रिमंडळाला बोलावले. सरकारने आतापर्यंत कोणत्याही निर्णयाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
इराणने हे प्रकरण बंद करण्याचे संकेत दिले असले तरी, इस्रायली लष्कराच्या प्रमुखांनी सांगितले की, हा हल्ला अनुत्तरीत राहणार नाही. एका वृत्तसंस्थेशी बोलताना इस्रायल डिफेन्स फोर्सचे चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्झी हालेवी म्हणाले की, इस्रायलवर इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल.
एक वरिष्ठ इराणी अधिकारी अबोलफझल अमोई यांनी सांगितले की इस्रायली प्रत्युत्तराच्या सर्व संभाव्य परिस्थितींसाठी देशाने सर्वसमावेशक धोरणे आखली आहेत. इस्त्रायली हल्ल्याच्या बाबतीत पूर्वी न वापरलेली शस्त्रे तैनात करण्यासाठी देश तयार आहे, असेही ते म्हणाले.





