संत एकनाथांचे कार्य समाजापुढे नव्याने यावे : ह.भ.प. पुष्कर महाराज गोसावी

भामचंद्र, चाकण – संत एकनाथ महाराजांचे कार्य प्रत्येक काळात, प्रत्येक पिढीत मार्गदर्शन करणारे आहे. ते सामाजिक एकोपा जपणारे आहे. संत एकनाथांचे कार्य समाजापुढे नव्याने यावे. त्यांच्या या कार्याला ‘ज्ञानबातुकाराम’ या वार्षिकाच्या संत एकनाथ महाराज विशेषांकाने उजाळा दिला आहे, असे प्रतिपादन संत एकनाथ महाराजांचे १४वे वंशज डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांनी रविवारी (दि. १९) येथे व्यक्त केले.
‘ज्ञानबातुकाराम’ या वार्षिक अंकाच्या संत एकनाथ महाराज विशेषांकाचे प्रकाशन डॉ. गोसावी यांच्या हस्ते भामचंद्र डोंगर पायथा येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राच्या लोक व्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, संत एकनाथ महाराज यांचे वशंज हभप पुष्कर महाराज गोसावी, देहू संस्थानचे विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे, भारूडकार चंदाताई तिवाडी, संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे, ज्ञानबा तुकारामच्या संपादक डॉ. दीपा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ अवसक तसेच भामचंद्र डोंगर सप्ताह समितीचे सदस्य आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संत एकनाथ महाराजांनी आपल्या बंधुभावाच्या विचारांनी समाज जोडला. याच विचारांची सध्या समाजाला गरज आहे. कारण आपण जाती-जातींच्या नावाखाली एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेलो आहोत.
संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक म्हणाले, कुठल्याही विचारांना बहुजन समाजाने पाठिंबा दिल्याशिवाय तो विचार दृढ होत नाही. हेच ओळखून संत एकनाथ महाराजांनी आपला समाज प्रबोधनाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविला. शूद्रातिशूद्रांना, स्त्रियांना अधिकार देण्याचे कार्य संत ज्ञानदेवांनी केले. हेच कार्य संत एकनाथांनी पुढे नेले. या संत विचारांची सध्याच्या काळात गरज आहे. संत एकनाथ महाराज विशेष अंकाने ही गरज पूर्ण केली आहे.
भामचंद्र डोंगर सप्ताह कमिटीतर्फे मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्रस्ताविक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी केले तर आभार उद्धव धुमाळे यांनी मानले.
अजान वृक्षाची लागवड –
यावेळी आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी जवळील अजान वृक्ष, तसेच वटवृक्षाची लागवड प्रमुख पाहुणे, मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. ‘आई नाना’ प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ भारूडकार चंदाताई तिवाडी आणि सहकाऱ्यांनी विविध अभंग रचना सादर केल्या.



