पुणे जिल्हा | टोकाच्या राजकीय संघर्षात पाणीप्रश्न अडगळीत

मोरगाव, (वार्ताहर)- बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची हवा चांगलीच तापली आहे. कुठे घडाळ्याचे टिकटिक, कुठे तुतारीचे रणशिंग फुंकल्याचा आवाज येत आहे. मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहे. मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्याने पाण्यासाठी दररोज गंभीर ते किरकोळ भांडणे करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाणीप्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, लोणी भापकर, बाबुर्डी, काऱ्हाटी, जळगाव सुपे, जळगाव क.प., कऱ्हावागजपर्यंत मोरगाव प्रादेशिक नळ योजनेचे पिण्याचे पाणी येते. मात्र, जेजुरीजवळील नाझरे धरणातून पाणी पुरवठा होते. ते धरण कोरडे ठणठणीत पडले आहे. या भागात यंदा 1972 पेक्षाही बिकट अवस्था तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आहे.
पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झालेले आहे. पाणी ना पिण्याला, ना आंघोळीला, ना जनावरांना, ना शेतीला मग जगायच तरी कसं, हा प्रश्न या भागातील जनता विचारत आहे. कुपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तर ओढे, नाले, नदी, बंधारे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातच आटले आहेत. यामुळे मनुष्यांपेक्षाही पशुपक्ष्यांची पाण्यासाठी मोठी वाताहत होत आहे.
प्रत्यक्ष लागत असलेले पाणी व शासनाकडून चार ते पाच दिवसांतून मिळत असलेले पाचशे लिटर पाणी यामुळे गावोगावी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा सुरु आहे. पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या या मतदारसंघातील जनतेला ना घड्याळाची टिकटिक ऐकायची, ना तुतारी. फक्त आमच्यासाठी घोटभर पाणी असा सूर तालुक्याच्या पश्चिम भागातून ऐकू येत आहे.
गावकारभाऱ्यांची तारेवरची कसरत
लोकसंख्यापेक्षा कमी पाणी मिळत असल्याने पाणी वाटप करताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची तारेवरची कसरत करावी लागत आहे. सातत्याने होणाऱ्या कटकटीमुळे तरडोली ग्रामपंचायतीने बहुमताने ठराव मंजूर करुन पाणी पुरवठा करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. ही वेळ नाकर्त्या राज्यकर्त्यामुळेच आलेले आहे. गेले पन्नास वर्षे राजकारण हे पाण्याच्या भोवती फिरत आहे.
७५ वर्षांपासून पाण्यासाठी टाहो
कधी गुंजवणीचे तर कधी, कधी टाटा धरणाचे तर कधी वीर धरणाचे याच आशेवर जनता आजही असून पाण्यासाठी वाट पाहणारी ही चौथी पिढी आहे. या पाण्याकडे चातकाप्रमाणे लक्ष आहे. तीन पिढ्या शेतीच्या पाण्यासाठी आसुसलेली जनता शेतीचे नव्हे तर पिण्याचे पाणी तरी घोटभर तरी द्या असे सध्या म्हणत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना अजून पिण्याचे पाणी पोटभर मिळत नसल्याची खंत बारामती तालुक्यात आहे. राज्यात बसस्थानकापासून ते प्रशासकीय इमारतीबाबत एक मॉडेल ठरणारे बारामती मतदारसंघ मूलभूत सुविधा पुरविण्याच्या बाबतीत मात्र पिछाडीवर आहे. हे मात्र निश्चित आहे.





