Uddhav Thackeray : विश्वगुरू झुरळांना घाबरतात.! कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर घणाघात
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही नंतरची गोष्ट आहे. आधी सरकारने आंदोलकांशी चर्चा तरी करावी. पण सरकार चर्चा करायलाच घाबरत आहे. याचा अर्थ विश्वगुरू झुरळांना घाबरतात

Uddhav Thackeray : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. NEET-UG 2026 मधील कथित अनियमितता आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ने पुकारलेल्या आंदोलनाने आता संसद भवनाच्या दिशेने कूच केली आहे.
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी ‘चलो संसद’चा नारा देत मोर्चा काढला. मात्र, संसद परिसराच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले. यावेळी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला, तर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Uddhav Thackeray )
या आंदोलनामुळे एकीकडे दिल्लीच्या रस्त्यांवर संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातूनही केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. (Uddhav Thackeray )
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत अंधारे यांनी सरकारला थेट सवाल केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘दिल्लीतील आंदोलनाची बातमी आपल्या सगळ्यांना माध्यमांमधून पाहायला मिळत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. आंदोलकांचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवता आले असते. मात्र, प्रश्न चर्चेच्या पातळीवर सोडवण्याऐवजी आंदोलन मोडून काढण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दिसत आहे.’
यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईचा संदर्भ देत केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने आंदोलनाच्या ठिकाणाहून हटवण्यात आले, त्यातून सरकारचा आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी आंदोलन दडपण्याकडे कल दिसतो,’ असा आरोप अंधारे यांनी केला. (Uddhav Thackeray )
त्या म्हणाल्या, ‘पांढऱ्या चादरी घेऊन सोनम वांगचुक यांना हटवण्याचा प्रयत्न झाला. आपल्याकडे पांढऱ्या चादरी कधी वापरल्या जातात? शेवटच्या क्षणी. लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे, असा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे का? लोकशाहीचा मुडदा उचलायचा आहे, अशा पद्धतीने पांढऱ्या चादरी वापरल्या गेल्या,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरूनही हल्लाबोल (Uddhav Thackeray)
NEET-UG 2026 मधील कथित अनियमिततेवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही नंतरची गोष्ट आहे. आधी सरकारने आंदोलकांशी चर्चा तरी करावी. पण सरकार चर्चा करायलाच घाबरत आहे. याचा अर्थ विश्वगुरू झुरळांना घाबरतात,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली. (Uddhav Thackeray )
अंधारे पुढे म्हणाल्या, ‘ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या देशात लोकशाहीच्या नावाखाली लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसी कारवाई केली जात असेल, तर लोकशाहीच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण होतात.’ असं त्या म्हणाल्या.






