मुंबई – ऑक्टोबर महिन्यात कांदा आणि बटाट्यासह भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे हॉटेलमध्ये मिळणार्या मांसाहारी आणि शाकाहारी थाळीच्या दरात ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे. क्रिसिल ही संस्था देशातील विविध शहरातील जेवणाच्या दराची माहिती संकलित करून हा अहवाल सादर करते. या अहवालानुसार देशात सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात शाकाहारी थाळीचा दर वार्षिक पातळीवर 20 टक्क्यांनी वाढून 33.30 रुपये प्रति थाळी झाल. मासिक पातळीवरही हा दर वाढला. सप्टेंबर महिन्यात देशात सर्वसाधारणपणे शाकाहारी थाळीचा दर 31.30 प्रति थाळी असा होता. ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे दर 46 टक्क्यांनी वाढले आहेत. तर बटाट्याचे दर 51 टक्क्यांनी वाढले आहेत. या वस्तूचा शाकाहारी थाळीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. महाराष्ट्र, कर्नाटक मधून कांदा कमी आल्याने आणि उशिरा आल्यामुळे या दोन खाद्यान्नांच्या दरात वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये टोमॅटोचा दर दुप्पट वाढून 64 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टोमॅटोचा दर 29 रुपये प्रति किलो होता. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादन व पुरवठ्यावर परिणाम झाला होता. आता नोव्हेंबर महिन्यात हे दर स्थिर होण्याची शक्यता आहे. कारण मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातून टोमॅटोची आवक वाढू लागली आहे. या महिन्यात एकूणच भाजीपाल्याच्या दरात 40% वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीचा दर वाढला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये डाळींचा दर 11 टक्क्यांनीे वाढला. डाळीचे उत्पादन देशात कमी होते. त्यामुळे भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. इंधनाच्या दरात मात्र या महिन्यात 11% घट झाली. त्यामुळे दरवाढ जास्त झाली नाही. ऑक्टोबर महिन्यात बॉयलरचा दर 9 टक्क्यांनी कमी झाला. मात्र इतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात मांसाहारी थाळीचा दर वाढून 61.60 प्रति थाळी झाला. सप्टेंबर महिन्यात या थाळीचा दर 58.6 रुपये प्रति थाळी होता. मांसाहारी थाळी बनवण्यासाठी ज्या भाज्या लागतात त्यांचा दर वाढल्यामुळे या थाळीचा दरही वाढला आहे.