तृयीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठ भरणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

पुणे – राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क विद्यापीठाला भरावे लागणार आहे, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जाहीर केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबइत राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सहसंचालक प्रकाश बच्छाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, प्राचार्य अनिल राव आदी उपस्थित होते.
तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठाने स्वनिधीतून भरल्यास, या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येता येईल, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित सर्व कुलगुरूंनी बहुमताने हा निर्णय मान्य केला. त्यामुळे यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मोफत उच्च शिक्षण घेता येईल, असे सांगण्यात आले.




