‘केंद्राचा अर्थसंकल्प हा देशाचा बदला घेणारा अर्थसंकल्प’; तामिळनाडुच्या मुख्यमंत्र्यांनी केली सडकून टीका

चेन्नई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यंदाचा हा अर्थसंकल्प म्हणजे भाजपने देशावर उगवलेला सूड आहे असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे केंद्र शासन सध्या चुकामागून चुका करीत असून त्याचा परिणाम त्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये सोसावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नवी दिल्लीत होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना स्टॅलिन म्हणाले की, तामिळनाडूबद्दल केंद्राने जी अन्यायकारक भूमिका घेतली आहे त्यामुळे आम्हाला त्या बैठकीवर बहिष्कार घालावा लागला आहे.
ते म्हणाले की आपत्ती निवारणाच्या कामासाठी आम्ही ३७ हजार कोटी रूपयांची मागणी केली होती. ती दुर्लक्षित करण्यात आली. चेन्नई मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्याच्या विनंतीकडेही लक्ष दिले गेले नाही, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
भाजप केवळ राजकीय हेतूने सरकार चालवते असा आरोपही त्यांनी केला. २३ जुलै रोजी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प याचा पुरावा आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विविध राज्यांतील जनतेने जनविरोधी भाजपचा पराभव केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प त्या राज्यांविरुद्ध सूडबुद्धीने कृत्य केल्यासारखे वाटते.
ज्या राज्यांत इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे त्या राज्यांचा बदला घेणाराच हा अर्थसंकल्प आहे. केंद्रातील भाजप सरकार तामिळनाडूची सातत्याने अवहेलना करत आहे.
केंद्राने सर्व शिक्षा अभियानासाठी नेहमीप्रमाणे जारी केलेला निधीही रोखून धरला आहे, असे ते म्हणाले. राज्यांकडून आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क कमी करण्यात येणार असल्याच्या घोषणेवर ते म्हणाले की, राज्यांशी सल्लामसलत न करता असे करण्यात आले आहे.
जीएसटी प्रणालीने आधीच कर आकारणीचे अधिकार राज्यांकडून काढून घेतले आहेत. केंद्र सरकारने तामिळनाडुची २० हजार कोटी रूपयांची जीएसटी भरपाई देखील वितरीत केलेली नाही. या सगळ्यांबाबत भाजपने उत्तर दिले पाहिजे असे स्टॅलिन म्हणाले.





