जांबूत,(वार्ताहर)- बेल्हे – जेजुरी राज्य महामार्गावर अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट घोड नदीवरील पुलाच्या कठड्यावर आदळला. ही घटना बुधवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास घडली. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून पुलाच्या संरक्षण कठड्यावर ट्रक अडकल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब राज्यातून ट्रॅक्टरचे पार्ट घेऊन मोशी येथे बेल्हे- जेजुरी राज्यमार्गावरून जात असलेल्या अवजड वाहतूक ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने चांडोह-लाखणगावला जोडणाऱ्या घोड नदीच्या पुलाच्या कठड्यावर ट्रक आदळला. संरक्षण कठड्याच्या अडथळ्याने पुलावरती ट्रक अडकल्याने मोठा अनर्थ टळला. पुलाच्या तोंडावरच अपघात झाल्याने अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. यावेळी वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. बेल्हे जेजुरी राज्य मार्गावर दिवसेंदिवस जड वाहतूक वाढत असून औद्योगिक वसाहतीतील कंपन्याचा मालक वाहतूक करणाऱ्या वाहनाबरोबरच, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अर्धवट पुलाचे काम पूर्ण करा घोड नदीवरील हा पूल पूर आल्यावर पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होते, वाहतूकीस छोटा असल्याने या पुलाशेजारी नवीन उंच पुलाचे सुरू असलेले काम गेले सहा महिन्यांपासून बंद पडलेले आहे. सुरळीत वाहतूक होण्यासाठी पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी केली आहे.