‘पेसा’ क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आदिवासी विकास विभाग देणार पुरस्कार

नंदुरबार :- ग्रामविकासाची संकल्पना आपल्या असाधारण इच्छाशक्ती व कर्तृत्वातून साकारणाऱ्या ग्रामसेवकांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात येते, त्याचप्रमाणे राज्यातील पेसा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना आदिवासी विकास विभागामार्फत पुरस्कार देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, ग्रामविकासाची पायाभरणी ही गावातील लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीने होत असते. परंतु गावातील विकास करताना ग्रामसेवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी देखील म्हटले जाते. गावाच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची भूमिका व कर्तव्ये त्यांना पार पाडायची असतात. ग्रामपंचायतीच्या सभा किंवा मासिक सभा बोलावणे, त्यासाठी योग्य त्या नोटिसेस देणे, त्याचप्रमाणे त्या सभेमध्ये जे काही झाले ते लिहिणे आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्या सभेमध्ये जे काही निर्णय झाले ते सूचना फलकावर लावणे. असे अनेक कार्य हे ग्रामसेवकाला पार पाडावे लागत असतात.
ते पुढे म्हणाले, प्रशासन, नियोजन, शेती विषयक योजना, कुटुंब कल्याण कार्यक्रम, ग्रामविकासाच्या कल्याणकारी योजना, गाव माहिती केंद्र, पशू संवर्धन योजनांसह बहुतांश शासकीय कार्य पार पडण्याची जबाबदारी सरकारने ग्रामसेवकाला दिलेली असते. त्यामुळे ग्रामविकासाचे निर्णय हे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी जरी घेतले असले तरी ते गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचे काम ग्रामसेवक करत असतात, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
यावेळी वर्ष 2018-19, वर्ष 2019-20, वर्ष 2020-21 व वर्ष 2021-22 या चार वर्षांतील 24 उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवकांना यांचा यावेळी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.





