नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने 23 हजार किलोमीटरच्या मार्गिका अद्ययावत केल्या असून यामुळे रेल्वे 130 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्यासाठी मदत होणार आहे. तसंच 110 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे धावू शकणार्या 54 हजार किलोमीटर मार्गिकाही अद्ययावत केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली. यामुळे विविध प्रदेश रेल्वेने जोडले जाणार असून रेल्वेची कार्यक्षमता वाढणार आहे. वेग वाढवण्यासाठी मार्गिकांचं अद्ययावतीकरण, प्रगत सिग्नल यंत्रणा, आणि धोका टाळण्यासाठी कुंपण बसवून रेल्वे मार्गिकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयानं सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर महिन्यादरम्यान रेल्वेच्या कमाईत चार टक्के वाढ झाल्याचंही रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.