पुणे जिल्हा | प्री वेडिंगला फाटा देत जपली परंपरा

जेजुरी, (वार्ताहर)- सध्याच्या आधुनिक आणि यांत्रिक युगात नव वर-वधू प्रीवेंडिंग ही पाश्चात्य संस्कृती स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. पाश्चात्य देशातून आलेली प्री वेडिंग ही संस्कृती सुरुवातीच्या काळात दिल्ली, मुंबई, पुणे शहरात रुजू लागली; मात्र सध्याच्या काही वर्षांत ग्रामखेड्यातही या संस्कृतीचे लोण फोफावत असल्याचे दिसून येते.
मात्र, या प्रीवेडिंग संस्कृतीला मूठमाती देत.. पुरातन काळातील दगडी जाते, उखळ -मुसळ, दुरडी -सूप, लक्ष्मी आजोबा -आजीची प्रतिमा आदींचे पूजन आणि दिपप्रज्वलन करीत वृक्षारोपण करीत विवाहकार्याचा प्रारंभ करणार्या हर्षदा विजय झगडे यांनी आदर्श घालून दिला आहे.
जेजुरीवासीय एका उद्योजक परिवारातील हर्षदा झगडे या विधिज्ञ असून बारामती, पुणे येथील न्यायालयात त्या वकिली करतात. त्यांचा विवाह बारामती येथील एका संपन्न परिवारातील आणि बँकेत अधिकारी पदावर असलेल्या तरुणाबरोबर ठरला आहे. आपला विवाह हा अत्यंत साधेपणाने; परंतु वाडवडिलांनी दिलेल्या परंपरेनुसार साजरा व्हावा असा आग्रह हर्षदा यांनी धरला. दोन्ही परिवाराने तो मान्य केला.
विवाहाचे चार दिवस अगोदर देवकार्य, मुहूर्तमेढ रोवणे, सुवासिनींना चुडा (बांगड्या) भरणे आदी धार्मिक कार्याबरोबर त्यांनी आपल्या मामी आत्या, काकी मावश्या, आजी, चरणस्पर्श करीत त्यांचे आशीर्वाद घेत पारंपारिक दगडी जाते, उखळ -मुसळ, सूप -दुरडी, तुळशीवृंदावन, दिवंगत आजोबा -आजीची प्रतिमा, लक्ष्मी आदींचे पूजन तसेच वृक्षारोपण करीत विवाहकार्याला प्रारंभ केला.





