तिवरे गाव सिद्धीविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

मुंबई : रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यात धरण फुटून उद्धवस्त झालेल्या तिवरे गावाला दत्तक घेण्यासाठी सिद्धीविनायक मंदिर न्यास पुढे सरसावली आहे. मंदिर समिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी तिवरे हे गाव दत्तक घेणार असल्याची माहिती दिली. रत्नागिरीचे आमदार उदय सावंत यांनी न्यासकडे हे गाव दत्तक घेण्याची मागणी केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बांदेकर यांनी म्हटले आहे.
कोकणात 2 जुलैला मुसळधार पावसामुळे तिवरे धरण फुटून संपूर्ण गाव यात उद्धवस्त झाले होते. या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, धरण फुटल्याने सात गावात पाणी शिरले असले तरी सर्वात जास्त तिवरे गावाचे नुकसान झाले. त्यामुळेच आमदार उदय सावंत यांनी समितीकडे हे गाव दत्तक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता मंदिर न्यास ही जबाबदारी पार पाडणार आहे. गावातील उद्ववस्त झालेली घरे, शाळा बांधून देणे आणि लोकांच्या गृहपयोगी वस्तुंचे वाटप मंदिर न्यास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





