Ashok Gehlot : आता ती वेळ आलीय! राऊतांच्या अखंड काँग्रेसच्या वक्तव्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं स्टेटमेंट
Ashok Gehlot : अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मोठं विधान केले आहे.

Ashok Gehlot : भाजपविरोधात व्यापक रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘अखंड काँग्रेस’ची संकल्पना मांडत काँग्रेसमधून फुटून निर्माण झालेल्या प्रादेशिक पक्षांनी पुन्हा एकत्र यावे, अशी भूमिका मांडली. यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
या वक्तव्यानंतर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत काँग्रेस पक्षाकडून तशा प्रस्तावावर चर्चा दिल्लीत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मोठं विधान केले आहे.
अशोक गेहलोत यांनी काँग्रेसमधून वेगळे होऊन स्थापन झालेल्या प्रादेशिक पक्षांना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी सर्व लहान व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये परत यावे आणि राहुल गांधी यांना विरोधी आघाडीचा सर्वमान्य नेता म्हणून स्वीकारावे, असे मत व्यक्त केले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचे समर्थन करताना गेहलोत म्हणाले की, सध्या देशात लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकजूट दाखवून देशासमोर सक्षम नेतृत्व उभे करणे गरजेचे आहे. (Ashok Gehlot)
नेमकं काय म्हणाले अशोक गेहलोत? (Ashok Gehlot )
“जनतेसमोर एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी असे स्पष्ट चित्र निर्माण झाले, तर विरोधकांना अधिक पाठिंबा मिळू शकतो. सर्व पक्षांनी एकमताने राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारल्याचा संदेश गेला, तर देशाच्या मतदानाच्या पद्धतीतही बदल दिसून येईल. शिवसेना, सीपीआय(एम) आणि सीपीआय यांसारख्या पक्षांची स्वतंत्र विचारधारा आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. मात्र काँग्रेसमधून फुटून तयार झालेल्या पक्षांनी या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करावा,” असे आवाहन अशोक गेहलोत यांनी केले.
देशाच्या भवितव्यासाठी योगदान देण्याची हीच योग्य वेळ: गेहलोत (Ashok Gehlot )
“विद्यार्थी आणि युवकांनी आपल्या विचारधारेनुसार राजकारणात यावे. देशाच्या भवितव्यासाठी योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येकाने विविध विचारधारा समजून घ्याव्यात आणि राष्ट्रीय हित जपणाऱ्या प्रवाहात सहभागी व्हावे. राजकारणापासून दूर राहू नका. भविष्यात देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही काय योगदान दिले, असा प्रश्न इतिहास तुम्हाला विचारेल,” असेही अशोक गेहलोत म्हणाले.
हेही वाचा : Prajakta Mali : चाहत्यांसाठी गुडन्यूज! प्राजक्ता माळीची साऊथमध्ये एन्ट्री, नव्या प्रोजेक्टची अपडेट समोर






