“वाघाने फक्त पंजा उगारला, अजून जबडा उघडायचा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर योगेश कदम यांचा इशारा

Yogesh Kadam | महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणावर केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली आहे. ही फक्त पहिली कारवाई आहे, वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी इशारा दिला आहे.
योगेश कदम काय म्हणाले?
“जम्मू काश्मीर येथील पहलागममधून पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ला केला होता. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर कायम हल्ला करत राहणं, जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय देत राहणं, हे पाकिस्तान कायमच करत आला आहे, त्यांनी यातून कधी शिकवण घेतली नाही. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला, आता तरी पाक शिकवण घेईल, अशी आशा आहे,” योगेश कदम यांनी म्हंटले आहे.
“ही फक्त पहिली कारवाई आहे, वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा बाकी आहे, पण आम्हाला समाधान मिळालं आहे, भारतीय म्हणून हीच भावना वाटते, की पाकव्याप्त काश्मीर लवकरच ताब्यात घ्यावं,” अशा भावना योगेश कदम यांनी व्यक्त केल्या.
मोदी, शाह यांचे केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन कारण भारतीय लष्कराला नौदलाला सूट दिली, त्यांनी आपल्या पद्धतीने कारवाई करावी, असं सांगितलं, आतापर्यंत अशी सूट कोणत्याही पंतप्रधानांनी दिली नव्हती, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
“भारत आणि लष्कर सक्षम आहेत, भारताची ताकद पाहता पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याऐवजी एकटा पडताना दिसत आहे, कारण चीनचाही पाठिंबा त्यांना मिळताना दिसत नाही. लवकरच पाकिस्तान पांढरे निशाण फडकवेल. अमेरिकेसह सगळेच देश भारताला पाठिंबा देतील, “अशी आशाही योगेश कदम यांनी व्यक्त केली.
‘पाकव्याप्त काश्मीर लवकरच ताब्यात घ्यावा’
भारत एक विचार घेऊन पुढे जात आहे, तो दहशतवाद संपवण्याचा विचार आहे. आपला शेजारचा देश दहशतवाद्यांना आश्रय देत आहे आणि यामुळे भारताचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे ऑपरेशन सिंदूर हे महत्त्वाचे होते. गृहराज्यमंत्रिपद दुय्यम आहे, पण भारतीय नागरिक म्हणून वाटतं की पाकव्याप्त काश्मीर लवकरच ताब्यात घ्यावा आणि त्यांना कायमचा धडा शिकवावा,” असंही योगेश कदम म्हणाले.
हेही वाचा:
“…असाच धडा शिकवला पाहिजे”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर असदुद्दीन औवेसी यांची प्रतिक्रिया





