Khashaba Teaser : कुस्तीच्या आखाड्यातून ऑलिम्पिकपर्यंतचा थरार! ‘खाशाबा’चा जबरदस्त टीझर रिलीज, मुख्य भूमिकेत…
Khashaba Teaser : खशाबाचा टीझर चित्रपटगृहांमध्ये झळकल्यानंतर आता सोशल मीडियावरही या टीझरची जोरदार चर्चा रंगली आहे.

Khashaba Teaser : ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’सारखे गाजलेले चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता आणखी एका प्रेरणादायी कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स निर्मित ‘खाशाबा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
खशाबाचा टीझर चित्रपटगृहांमध्ये झळकल्यानंतर आता सोशल मीडियावरही या टीझरची जोरदार चर्चा रंगली आहे. पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचं भव्य चित्रण, दमदार दृश्यरचना, भावनिक संघर्ष आणि सिनेमॅटिक भव्यता यामुळे टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
‘खाशाबा’ हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. त्यांच्याच संघर्षमय प्रवासाची भव्य मांडणी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. (Khashaba Teaser)
हेही वाचा : Sharad Pawar NCP : शरद पवार गटाचा खासदार भाजपच्या वाटेवर? ‘ते’ विधान करताच स्पष्ट केली भूमिका
नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत (Khashaba Teaser)
चित्रपटाला संगीत क्षेत्रातील लोकप्रिय जोडी अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे, खाशाबा जाधव यांच्या भूमिकेसाठी हजारो इच्छुक कलाकारांमधून ऑडिशन प्रक्रियेनंतर एका नवोदित कलाकाराची निवड करण्यात आली असून, तो अभिनेता नेमका कोण आहे त्याचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. लवकरच त्याच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Khashaba Teaser)
या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार असून, यामध्ये जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत.
ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘खाशाबा’ हा बहुचर्चित चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





