Pimpri : जीबीएसचा तिसरा बळी! पिंपरीतील ३६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणेः शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचे रुग आढळून येत आहेत. या आजारामुळे आता एका ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. जीबीएसची लागण झाल्यानंतर या तरुणाला न्यूमोनियाचीही लागण झाली होती. ३० जानेवारी रोजी महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराची लागण झाल्यानंतर या तरुणाला न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत जीबीएसचे १३ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. यापैकी काही रुग्णांना सोडण्यात आले असून काही रुग्ण उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी जीबीएसची लागण झालेल्या आणि त्यानंतर न्यूमोनिया झालेल्या एका ६७ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता.
या महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, या महिलेचा मृत्यू जीबीएसमुळे झाला नसल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे. त्यानंतर आता जीबीएसमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला, उपचारात हयगय झाली का, याची चौकशी करण्यासाठी वायसीएमने समिती स्थापन केली आहे.
मार्गदर्शक सूचना जारी
या आजाराची गांभीर्याने दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून आता जीबीएसी आजारासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जीबीएसची रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आरोग्य सचिवांची भेट
सध्याच्या घडीला राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या १३० वर जाऊन पोहचली असून आत्तापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत एका बैठकीत पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी औंध जिल्हा रुग्णालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. रुग्णांवरील उपचार आणि औषधांच्या उपलब्धतेबाबत त्यांनी डॉक्टरांना सूचना केल्या आहेत.





