IND vs AUS 3rd Test : ब्रिस्बेन कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार बदल? ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार डच्चू….

IND vs AUS 3rd Test : ॲडलेडमधील पराभवानंतर आता टीम इंडिया गाबामध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत अनेक बदलांसह मैदानात उतरू शकते. भारतीय संघाने पर्थमध्ये कांगारूंचा 295 धावांनी पराभव करून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात विजयाने केली, परंतु ऑस्ट्रेलियाने पलटवार करत ॲडलेडमध्ये भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता उभय संघांमधील तिसरा कसोटी सामना शनिवार, 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जाणार आहे.
ॲडलेडमधील पराभवानंतर रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना गाब्बा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळलं जाऊ शकते. अश्विन आणि राणा संघाबाहेर असू शकतात, तर राहुलच्या जागी कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतो. तर केएल राहुल मधल्या फळीत खेळू शकतो.
यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा हे गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल हे निश्चित आहे. गिलनंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. गाबाचा हिरो म्हणजेच ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे.
पंतनंतर केएल राहुल सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. यापूर्वी राहुलने दोन कसोटी सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली होती. मात्र, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा संघासोबत नव्हता. दुसऱ्या कसोटीत रोहित सहाव्या क्रमांकावर खेळला. अश्विनच्या जागी या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर नितीशकुमार रेड्डी खेळताना दिसणार आहेत. उर्वरित तीन वेगवान गोलंदाजांपैकी आकाशदीप आता मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहसह ॲक्शनमध्ये दिसणार आहे. आकाशदीपला संधी भेटल्यास हर्षित राणाला संघातून वगळलं जाऊ शकते.
हर्षितच्या जागी आकाशदीपला संधी?
वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर हर्षित राणाच्या जागी आकाशदीपला संधी मिळू शकते. हर्षित राणाने पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी केली, पण दुसऱ्या कसोटीत तो प्रभावी दिसला नाही. त्याला दुसऱ्या कसोटीत एकही बळी घेता आला नाही. त्यानं 16 षटके टाकली अन् 86 धावा दिल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज खेळणार हे निश्चित आहे.
IND vs AUS 2nd Test : विजयानंतरही ऑस्ट्रेलियाचे टॉप ऑर्डरचे सर्व फलंदाज दडपणाखाली – वॉर्नर
जडेजा की सुंदर?
संघातील दुसरा बदल म्हणजे रविचंद्रन अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. अश्विन दुसऱ्या कसोटीत विशेष काही करू शकला नाही. त्याची अष्टपैलू खेळाडूत गणना केली जाते. पण दुसऱ्या कसोटीत त्याला केवळ एकच बळी मिळवता आला. तसेच फलंदाजीमध्ये पहिल्या डावात 22 तर दुसऱ्या डावात त्यानं केवळ 7 धावा केल्या. सध्या भारतीय संघाची फलंदाजी कमजोर दिसत आहे. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजा परदेशात प्रभावी ठरू शकतो. वॉशिंग्टन सुंदर पर्थ कसोटीत खेळला आहे. त्याच्याकडेही फलंदाजीची क्षमता आहे. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत काय बदल होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर/रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) , मोहम्मद सिराज आणि आकाशदीप/हर्षित राणा.





