‘भूल भुलैय्या’चा तिसरा पार्ट येणार… ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

मुंबई – अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीनं ‘भूल भुलय्या’ हा चित्रपट २००७ मध्ये केला होता. अक्षय कुमारची भन्नाट कॉमेडी आणि त्याला मिळालेली राजपाल यादव सारख्या इतर विनोदी अभिनेत्यांची साथ तसेच मंजुलिकाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री विद्या बालन यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर निर्मात्यांनी अभिनेता कार्तिक आर्यनला घेऊन चित्रपटाचा दुसरा भाग देखील आणला होता. ज्याला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. आता निर्मात्यांनी भूल भुलैय्याचा तिसरा भाग येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भूल भुलैय्या हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांनी देखील याला भरभरून प्रेम दिले. दुसऱ्या भागात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांच्यासह अभिनेत्री तब्बू देखील होती. पहिल्या भूल भुलैय्याप्रमाणेच दुसऱ्या भागानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. त्यानंतर आता निर्माते भूषण कुमार यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या पर्वाबाबत भाष्य केले आहे.
आम्ही भूल भुलैय्याच्या तिसऱ्या पार्टच्या स्क्रिप्टवर काम करत आहोत अशी माहिती भूषण कुमार यांनी दिली.यावेळेला आणखी काहीतरी हटके करणार असल्यामुळे या चित्रपटासाठी थोडा जास्त कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. तसेच तिसऱ्या भागात देखील कार्तिक आर्यनच प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे कार्तिकचे फॅन्स देखील चांगलेच खुश झाले आहेत.




