नागपूरच्या जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी; सिंहासन सुद्धा केले लंपास

नागपूर – येथील जुनी शुक्रवारी भागात असलेल्या शीतलनाथ राजस्थानी दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान चोरट्याने मंदिरातून दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
चोरट्याने जामदार हायस्कूलमधील बांधकामाची शिडी वापरून मंदिराच्या नागनदीकडील दरवाजा तोडला. त्याने चांदीच्या पाच मूर्ती, सिंहासन, छत्री आणि मंत्र कोरलेले भामंडल चोरले. मात्र अष्टधातू आणि पितळेच्या मूर्ती तशाच ठेवल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर कैद झाला आहे.
मंदिर सचिव मुकेश सिंहावत यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरावर पाळत ठेवणाऱ्या युवकानेच ही चोरी केल्याचा संशय आहे. चोरट्याने दानपेटी गॅलरीत नेऊन उघडली. त्यातून १०० रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या किमतीच्या नोटा नेल्या. मात्र १० ते ५० रुपयांच्या नोटा तशाच सोडून दिल्या.
दोन मजली मंदिर इमारतीच्या तळमजल्यावर एक कुटुंब देखभालीसाठी राहते. पहिल्या मजल्यावर मंदिर असून दुसऱ्या मजल्यावर भक्तांसाठी वस्त्र बदलण्याची व्यवस्था आहे. मंदिर सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुले असते. सायंकाळी फक्त आरतीसाठी ७ वाजता उघडले जाते. चोरीत गेलेल्या चांदीच्या मूर्तींचे एकूण वजन सुमारे २० किलो आहे.





