ठाकरे गटाला संसदेत मिळणार स्वतंत्र कार्यालय ! खासदारांनी घेतली अध्यक्षांची भेट

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये असलेले शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले. यानंतर आता ठाकरे गटाला नवीन संसदेमध्ये स्वतंत्र कार्यालय मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे.
संसदेमध्ये असलेल्या शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षावर हक्क सांगण्यास सुरूवात केली होती. आता शिवसेना पक्षच शिंदेंच्या ताब्यात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे काय होणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत होता. मात्र, आता ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यापूर्वी खासदारांनी पत्र लिहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी पक्षकार्यालय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता खासदारांनी थेट बिर्ला यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, 28 जुलै 2022 रोजी शिंदे गटाने संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले होते. शिंदे गटात 12 खासदार आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मान्यता दिली होती.





