मुंबई : बेस्ट कर्मचारी क्रेडिट सोसायटी निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने आज कार्यकारिणीचा मेळावा घेतला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. “ठाकरे ब्रँडची अजून सुरुवातच झाली नाही, सुरुवात झाली की तुमचा बँड कसा वाजतो ते बघा!” असा थेट इशारा त्यांनी दिला. बेस्टच्या कामकाजात सुधारणा, कर्मचारी हक्क आणि मराठी माणसाच्या स्थानासाठी लढण्याचे आवाहनही त्यांनी केले. पराभवातून खचणार नाही मेळाव्यात ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. “एका पराभवाने खचायचे नाही. पराभव तात्पुरता असतो. पुढच्या वेळी अधिक ताकदीने निवडणूक लढू आणि विजय मिळवू,” असे ते म्हणाले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बेस्टच्या सेवेची गुणवत्ता वाढवणे आणि कर्मचारी हितासाठी आवाज उठवण्यावर उद्धव ठाकरेंनी भर दिला. ठाकरे यांनी बेस्टच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली. “बेस्ट ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. मला बेस्टच्या कामगारांपेक्षा बेस्टचं काय होईल याची काळजी आहे. आमचं सरकार असतं तर बेस्टला वैभव प्राप्त झालं असतं. पण गद्दारीमुळे सत्ता गेली. त्यांच्या निष्ठा कोणाच्या पायी आहेत, हे सर्वांना कळलंय,” असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. बेस्ट, महापालिका आणि एसटीमधील कर्मचारी जागा कंत्राटी तत्त्वावर भरण्याच्या धोरणावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “कामगारांना अस्थिर ठेवलं जातंय, त्यांच्या डोक्यावर लटकती तलवार ठेवली जाते. याविरुद्ध बेस्ट कामगार सेना लढते.” “चोरशाही, लोकशाही नाही” निवडणुकीत बोगस मतदान आणि मत चोरीच्या आरोपांवर ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “बोगस मतदान करायचं आणि जनतेचा आशीर्वाद मिळाल्याचं मिरवायचं, याला लोकशाही नाही, चोरशाही म्हणतात,” असे त्यांनी ठणकावले. बेस्ट आणि मुंबई महापालिकेच्या संभाव्य खासगीकरणावर टीका करताना ते म्हणाले, “बेस्ट अदानींच्या हातात देण्याचा डाव आहे. विमानतळ दिलं, मोनो अनिल अंबानींकडे गेली. पण बेस्ट आणि एसटी ही आपली रक्तवाहिनी आहे. मी स्वतः बेस्टने प्रवास केलाय, तुंबलेल्या पाण्यातून ती कशी निघते हे पाहिलंय.” असं ठाकरे म्हणाले. मराठी माणसासाठी लढा मुंबईतील मराठी माणसाच्या अस्मितेवर ठाकरे यांनी जोर दिला. “मुंबई महाराष्ट्राने मिळवली, पण मराठी माणसाला स्थान नव्हतं. त्याच्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. आम्ही कट्टर राष्ट्राभिमानी हिंदू आहोत, मराठी माणसाचे हक्क जपणारे आहोत,” असे ते म्हणाले. बेस्ट निवडणुकीत पराभव का झाला याची चिकित्सा करण्याचे आवाहन करताना त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, “ठाकरे ब्रँड म्हणजे मराठी आणि हिंदूंसाठी लढणारा पक्ष. त्याची सुरुवात अजून झालीच नाही. जेव्हा होईल, तेव्हा विरोधकांचा बँड वाजेल!”