Pimple Saudagar : दहा वर्षांचा वनवास संपणार! प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून सहा महिन्यांत विकसित
Pimple Saudagar : नाना काटेंचा पुढाकार

पिंपरी – पिंपळे सौदागरमधील झुलेलाल सोसायटी, ट्रायोस सोसायटी ते नॅच्यूरल आइस्क्रीम दरम्यानचा गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला १८ मीटर रुंदीचा रस्ता अखेर मार्गी लागणार आहे.
माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक नाना काटे यांच्या पुढाकारातून खासगी विकसकाच्या माध्यमातून या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असून, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
या कामाची पाहणी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी नाना काटे यांच्या उपस्थितीत ट्रायोस सोसायटी, झुलेलाल टॉवर सोसायटी आणि सुखवाणी सेलिनो सोसायटीतील नागरिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी रस्ता प्रलंबित असल्यामुळे वाहतूक, पावसाळ्यातील गैरसोय आणि दैनंदिन ये-जा करताना होणाऱ्या अडचणी मांडल्या.
या रस्त्याच्या विकासासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुखवाणी प्रमोटर्स अँड बिल्डर्स यांच्या माध्यमातून हे काम विकसित करण्यात येणार असून, युनिटेक्स इन्फ्राकडून प्रत्यक्ष काम केले जाणार आहे. त्याबदल्यात संबंधित विकसकाला महापालिकेमार्फत टीडीआर अथवा एफएसआयच्या स्वरूपात मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती नाना काटे यांनी दिली.
MPSC: एमपीएससी निकालात ‘महाज्योती’ची भरारी
रस्त्याच्या कामासोबत स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, भूमिगत केबल, फुटपाथ, काँक्रीट रस्ता आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची कामेही करण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यासह नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे.
बैठकीस असावानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे प्रमुख श्रीशेठ असावानी, युनिटेक्स इन्फ्राचे घाडगे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच विविध सोसायट्यांचे चेअरमन, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांपासून केवळ आश्वासनांपुरता राहिलेला हा प्रश्न आता खासगी विकासाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मार्गी लागणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही मिळाल्याने पिंपळे सौदागरमधील या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न अखेर सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
Satara: कॉ. शेख काका व डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी उद्या कार्यक्रम




