MPSC: एमपीएससी निकालात ‘महाज्योती’ची भरारी
MPSC: ,‘Mahajyoti’ ,soars , MPSC results

१२३ विद्यार्थ्यांचे यश; राज्य करनिरीक्षक, दुय्यम निबंधक मुख्य परीक्षा
MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट- ब दुय्यम सेवा २०२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य करनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक मुख्य परीक्षेच्या निकालात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) १२३ बहुजन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
राज्य करनिरीक्षक पदाच्या एकूण २८० जागांपैकी १०१ जागांवर महाज्योतीचे विद्यार्थी यशस्वी झाले असून, एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये त्यांचा वाटा ३५ टक्के आहे. दुय्यम निबंधक पदाच्या ८४ जागांपैकी २२ विद्यार्थी महाज्योतीचे आहेत. या पदातील यशस्वी उमेदवारांमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांचा वाटा २५ टक्के आहे.
बहुजन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचे हे यश आहे. दोन्ही पदांमध्ये मिळून १२३ विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश संस्थेच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाची प्रभावीता अधोरेखित करणारे आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यातही महाज्योतीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होतील, असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केला.
“ग्रामीण व सर्वसामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांचे एमपीएससीच्या परीक्षेतील हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही एकाही बहुजन विद्यार्थ्याचे स्वप्न आर्थिक किंवा इतर अडचणींमुळे अपूर्ण राहू नये, यासाठी शासन आणि महाज्योती संस्था पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील.”
– अतुल सावे, अध्यक्ष, महाज्योती




