शिक्षकांच्या बदल्या तालुकांतर्गतच असाव्यात

विधानसभेत आवाज उठवणार-आमदार पवार यांचे आश्वासन
न्हावरे – राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या त्या-त्या तालुक्याअंतर्गतच करण्यासाठी शिक्षक संघटना, शिक्षक नेते व शिक्षक यांच्याशी चर्चा करून विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे. यासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन व गव्हाण पूजन समारंभ तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी अशोक पवार तालुक्यातील शिक्षकांशी बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या तालुक्याबाहेर बदल्यांचा ऑनलाइन चाललेला खेळ खंडोबा थांबवण्यासाठी आगामी काळात विधानसभेत महत्त्वाची भूमिका घेतली जाईल. ऑनलाइन बदल्यांमुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या शिक्षक कार्यरत असलेल्या तालुक्याच्या बाहेर किंवा कधी-कधी जिल्ह्याच्या बाहेरही झाल्या होत्या. त्याचा परिणाम शिक्षकांच्या क्रय शक्तीवर होत असल्याचे अनेक शिक्षक संघटनांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
टक्केवारी 10 टक्केच असावी
पुणे जिल्ह्यात सुमारे अकरा हजार प्राथमिक शिक्षक कार्यरत असून, बदल्यांच्या ‘खो’ पद्धतीमुळे जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यातील शिक्षकांच्या तालुका बाहेर बदल्यांची टक्केवारी सुमारे 50 ते 55 टक्क्यांपर्यंत वाढली होती. ती टक्केवारीही 10 टक्के इतकीच असावी. त्यामध्ये 5 टक्के प्रशासकीय व 5 टक्के विनंती बदल्या असाव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.व
बदल्यांच्या जीआरमध्ये चांगली दुरुस्ती करून सर्व शिक्षकांना योग्य तो न्याय मिळावा. विस्थापित झालेल्या शिक्षकांना पुन्हा स्वतःच्या तालुक्यात येता यावे, अशा प्रकारची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. अशी दुरुस्ती सन-2012 मध्ये राज्याचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. त्याच पद्धतीची दुरुस्ती आताही होणे आवश्यक आहे.
– बापूसाहेब लांडगे, अध्यक्ष-शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ





